बंद

श्री सिद्धिविनायक मंदिर

श्रेणी ऐतिहासिक

श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास, प्रभादेवी,मुंबई.
श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराची माहिती पुढीलप्रमाणे:-

प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायकाचे सुप्रसिध्द मंदिर बृहन्मुंबईतील अत्यंत लोकप्रिय आणि जागृत देवस्थान आहे. संपूर्ण भूतलावर पसरलेल्या लक्षावधी भक्तांचे हे श्रद्धास्थान आहे. हे देवस्थान पुरातन असून कार्तिक शुद्ध चतुर्दषी शालिवाहन षके १७२३ (सन १८०१) मध्ये पहिला जीर्णोद्धार/नूतनीकरण विधीपूर्वक श्री. लक्ष्मण विठू पाटील यांच्या मार्फत संपन्न झाला असे उपलब्ध माहितीवरून दिसून येते .श्रीसिद्धिविनायक हे मंदिर गेल्या दोनशे वर्षांपासून येथे अस्तित्वात असल्याचे यावरून स्पष्ट होते. मुंबईतील बाणगंगा संकुलात आगदी आशीच संगमरवरी मूर्ती अस्तित्वात आहे. या दोन्ही मूर्ती एकाच कारागिराने घडवल्या असाव्यात . बाणगंगा देवस्थान संकुल ५०० वर्षांहून अधिक जुने आहे, हे लक्षात घेता प्रभादेवी मंदिरातील मंदिराची रचना सुमारे ५०० वर्षे इतकी पुरातनअसावी असे म्हणता येईल. सन १९३६ या वर्षापासून असून मंदिरातील पूजाअर्चा आणि अनुशंगिक व्यवस्था श्री गोविंदराव फाटक यांच्याकडून करण्यात येऊ लागली “श्री संत जांभेकर महाराज” यांच्या आदेशावरून श्री फाटक हे काम करू लागले आपली गिरणीतील नोकरी सांभाळून त्यांनी ही जबाबदारी चांगल्या पद्धतीने सांभाळली त्यानंतर वय झाल्यामुळे दि. ३१ डिसेंबर १९७३ रोजी त्यांना सेवेतून निवृत्ती घ्यावी लागली. या काळातच मंदिराची विश्वस्त व्यवस्था गठीत झाली. शासनाचे अधिकारी असलेले प्रशासकीय विश्वस्त यांच्या कडून मंदिराचे व्यवस्थापन होऊ लागले. योग्य व्यवस्थापन अंतर्गत पूजाअर्चा साठी आवश्यक पुजारी तसेच कर्मचारी यांच्या नियुक्त्या केल्या. सन १९५४ मध्ये मंदिराच्या जागेतील तलाव बुजवून एकूण भूभागातील भूखंड श्री सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्थेला ५० वर्षांच्या काळासाठी भाडेपट्ट्याने देण्यात आला मंदिराला त्याकाळी मिळणार्‍या तुटपुंज्या उत्पन्नातून व्यवस्थापनाचा खर्च भागविण्यासाठी पूरक सहाय्यक मिळावे म्हणून हा भाडेपट्टा देण्यात आला. त्यानंतर मंदिराची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढू लागली. त्याचबरोबर मंदिर विश्वस्त व्यवस्थेबद्दल काही वादग्रस्त लिखाण वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाले. काही ही न्यायालीन वादही उद्भवले मंदिर हे भक्ताच्या अतिव श्रद्धेचे स्थान आहे. आणि आणि अशा प्रकारच्या वादामुळे त्यांच्या भावनांना/श्रद्धेला धक्का तर बसतो, पण त्यामुळे मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या संख्येवर परिणाम होतो हे शासनाच्या लक्षात आल्याने या विश्वस्त व्यवस्थेची पुनर्रचना करून थेट शासनाच्या देखरेखीखाली तिच्या अतिरिक्त निधीतून भक्तांना सुविधा देणे, अधिक व्यापक समाज कल्याण हाती घेणे या उद्देशाने एका समूह समितीमार्फत तिची व्यवस्थापन व्हावे यासाठी एक स्वतंत्र अधिनियम करण्याचे ठरविले हे तातडीने करण्यासाठी ११ ऑक्टोंबर १९८० रोजी “श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर विश्वस्त व्यवस्था (प्रभादेवी)”
अध्यादेश जारी केला. यथावकाश त्याचे रीतसर अधिनियमात रूपांतरण करण्यात आले त्यानुसार आता श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर विश्वस्त व्यवस्था प्रभादेवी अधिनियम १९८०” च्या तरतुदीनुसार शासन नियुक्त अध्यक्ष, कोषाध्यक्ष ,आणि सात किंवा नऊ पेक्षा कमी इतर सदस्य यांच्या मिळून झालेल्या समितीद्वारे विश्वस्त व्यवस्थेचे (न्यासाचे) व्यवस्थापन करण्यात येते . सदर समितीचे कार्यकारी अधिकारी हे पदसिद्ध सचिव म्हणून काम पाहतात. मंदिराची जुनी वास्तु फार लहान आणि दर्शन घेण्याच्या दृष्टीने फार गैरसोईची होती. भक्ताच्या दिवसेंदिवस वाढणाऱ्या संख्येला ती अत्यंत अपुरी पडत होती. एकावेळी दाटीवाटीने केवळ १५-२० भक्त त्यात सामावू शकत होते. या भक्तांना सुलभतेने आणि शीघ्रतेने दर्शन घेता यावे, त्यांना”श्री” च्या सेवेचे/भक्तीचे समाधान लाभावे, पूजेसाठी सुविधांची तरतूद करण्यात यावी या उद्देशाने मंदिराच्या विस्तारीकरणाच्या / नूतनीकरणाच्या प्रकल्पाचा संकल्प करण्यात आला दि.२७ एप्रिल १९९० रोजी वैशाख शुद्ध तृतीयेच्या (अक्षय तृतीयेच्या ) शुभ दिनी राज्याचे माजी मुख्यमंत्री मा. ना. श्री . शरदचंद्रजी पवार यांच्या शुभहस्ते मंदिराच्या प्रस्तावित प्रसादवास्तूच्या भूमिपूजनाचा समारंभ संपन्न झाला.अडचणीचे अनेक डोंगर पार करून मंदिराच्या नूतनीकरणाचा / विस्तारीकरण प्रकल्प पूर्ण झाला आणि मंदिराची आजची नयनरम्य आणि सुबक प्रसादवास्तु साकार झाली. या प्रसाद वस्तूच्या कळस प्रतिष्ठापनेचा सोहळा अतिशय भव्यतेने व थाटामाटाने साजरा करण्यात आला. “वैशाख वद्य एकादशी शके १९१६ शनिवार, दि.४ जून १९९४ “मध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री मा.ना श्री शरद चंद्रजी पवार यांच्या हस्ते या सोहळ्याचा शुभारंभ झाला. प्रत्यक्ष कळस प्रतिष्ठान सोहळा “जगद्गुरु श्री शंकराचार्य दक्षिणाम्नाय श्रीशारदापीठ शृंगेरी श्री श्री १००८ भारती तीर्थ महास्वामीजी” यांच्या शुभहस्ते ज्येष्ठ शुद्ध चतुर्थी षके १९१६ सोमवार दि.१३जून १९९४” या शुभ दिनी संपन्न झाला मंदिराच्या /व्यवस्थापनाच्या दोनशे वर्षाचा इतिहासातील हा सर्वोच्च संस्मरणीय दिवस म्हणून गणला जाईल.
श्रीसिद्धिविनायकाची महती
श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर, प्रभादेवी” हे अतिशय पुरातन आणि प्रसिद्ध देवस्थान आहे. या मंदिराची प्रथमता रचना दि.१९ नोव्हेंबर १८०१ मध्ये झाली या मंदिरातील श्रीसिद्धिविनायकाची मूर्ती काळा पाषाणाची असून, ती बैठकीपासून किरीटापर्यंत अडीच फूट उंचीची असून तिची रुंदी सुमारे दोन फूट एवढी आहे. मूर्ती उजव्या सोंडेची असून तिच्यावरच्या एका हातात कमळ दुसऱ्या हातात लहान परषु, खालील उजव्या हातात जपमाळा आणि डाव्या हातात लाडू ची वाटी आहे. ती मूर्ती महादेव शंभोप्रमाणे त्रिनेत्रधारी आहे. ही मूर्ती एका पाषणामध्ये कोरलेली असून चरणाजवळ लहानसा मूशक (उंदीर) आहे. हा श्री सिद्धिविनायक कमळावर पद्मासन घालून बसलेला आहे. हे फक्त गणेशाला (नरकुंजरूपाला) गणपती म्हणतात परंतु रिद्धी – सिद्धी सहित असलेल्या गणेशाला महागणपती म्हणतात. विशेष म्हणजे ही मूर्ती संजीवन आहे आहे श्री सिद्धिविनायकाच्या गळ्यात सर्पाकृती यज्ञोपवीत (जानवे) आहे. दोन्ही बाजूने रिद्धी -सिद्धी ऐश्वर्य, भरभराट,सुख-समृद्धी,मांगल्य यांच्या देवता उभ्या आहेत संपूर्ण मूर्ती रक्तगंधालीप्त आहे. तिचा मुकुट सोनेरी असून रिद्धी-सिद्धीच्या मूर्ती हिरव्या रंगाच्या साड्यांमध्ये अलंकृत आहेत
श्रीसिद्धिवविनायकाचे मंदिर
मंगळवार, संकष्ट चतुर्थी आणि अंगारक संकष्ट चतुर्थीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनाला करता येतात. मंदिराची वास्तु पाच मजली असून गाभाऱ्यातील प्रत्येक मजल्यावर विशिष्ट भिंती बांधून कळसा पर्यंत मोकळी जागा राहील, याची जाणीव पूर्वक काळजी घेतली आहे. दि.१३ जून १९९४ रोजी मंदिराची नवीन वास्तू बांधण्यात आली सदर वास्तू बांधताना जुन्या मंदिराचा कळस उतरवून बांधलेला नवा कळस हा १५०० किलो वजनाचा असून बारा फूट उंच, सुवर्णवेशिटत आहे. गाभाऱ्यासमोर दुरून दर्शन घेण्याकरिता १३ ते १४ फूट उंचीचा सभामंडप असून, तेथे भक्तजनांनी करावयाच्या पूजा, गणेश याग, श्री सत्यनारायणाच्या पूजा होतात. पहिला मजला पोटमाळा म्हणून पूजा आणि दर्शनासाठी उपयोगात आणला जातो. दुसऱ्या मजल्यावर नैवेद्यासाठी स्वयंपाकगृह आणि ब्रह्मवृंदासाठी विश्रांतीगृह असून, स्वयंपाक घर आणि गाभारा उद् वाहनाने जोडला आहे. सुरक्षा व्यवस्था म्हणून सीसीटीव्ही कॅमेरा याचा संपूर्ण युनिटची योजना करण्यात आली आहे. तिसऱ्या मजल्यावर न्यासाचे अध्यक्ष, कोषाध्यक्ष ,विश्वस्त यांची दालने असून सदस्य कक्ष, अभ्यांगत कक्ष, समिती सभागृह स्वागत आणि दूरध्वनी कक्ष स्थित आहेत. चौथ्या मजल्यावर आधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज असे कार्यकारी अधिकारी कक्ष, प्रशासन विभाग लेखा विभाग रोख मोजणी दालन आणि दागदागिने मूल्यांकन विभाग स्थापित करण्यात आले आहेत तसेच या मजल्यावर उप कार्यकारी अधिकारी वित्त -लेखा अधिकारी यांची दालने आहेत त्याचप्रमाणे पाचव्या मजल्यावर महाप्रसाद विभाग आहे
वैभव संपन्न आणि इच्छापूर्ती श्री सिद्धिविनायक
मुंबईतील प्रभादेवी भागात वास्तव्यास असलेले श्री रामकृष्ण जांभेकर महाराज ज्या ज्या वेळी अक्कलकोट श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास जात त्या त्या वेळी श्री स्वामी समर्थ समाधीतून बाहेर येऊन त्यांना भेटत असत. तेथील वटवृक्षाखाली तासन-तास त्या दोघांमध्ये अध्यात्मावर चर्चा होत असे. आई मुलाची तळमळीने वाट पाहते, आपले मुलं भेटल्यावर तिला आनंद होतो. तसे प्रेम श्री स्वामी समर्थांचे श्रीराम कृष्ण जांभेकर महाराजांवर होते. अशाच एका रात्री श्री स्वामी स्वामी समर्था समवेत श्री जांभेकर महाराज बसले असता त्यांना श्री स्वामी समर्थनी विचारले की, रामकृष्णा तुला काय हवे ?”
त्यावेळी श्री जांभेकरांनी स्वतःसाठी काही न मागता श्री स्वामी समर्थ ना सांगितले की, “आपणाला काही द्यायचे असल्यास आपण माझ्या श्री सिद्धिविनायकाला वैभव द्या !” हे ऐकून श्री स्वामी समर्थांना परमानंद झाला. श्री सिद्धिविनायकाला वैभव दिल्याने त्याठिकाणी भक्तांचा लोंढा वाढेल आणि तो वैभवसंपन्न बाप्पा भक्तांना यावत् चंद्र दिवाकरौ देत राहील ही एक मागणीत दोन हेतू साध्य करण्याची कल्पना श्री स्वामी समर्थांना आवडली. त्यांनी श्री जांभेकरांना आपल्या अजाणबहूंनी आशीर्वाद दिला, प्रेमाने जवळ घेऊन म्हणाले केवढे हे शहाणपण तुझ्या ठाई आहे. असा भक्त मला लाभला हे माझे भाग्यच आहे तू मुंबईला गेल्यावर मंगळवारी तुझ्या प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाला जा. तिथे मंदिराचे रोपटे लाव. तुझा हा मंदार इंचा इंचाने वाढेल, तसा श्री सिद्धिविनायक वाढेल. ज्या दिवशी मंदार बहरलेला असेल” श्री स्वामी समर्थांनी तथास्तु म्हटले आणि वटवृक्षाच्या दिशेने अंतर्धान पावले. काही क्षणानंतर श्री जांभेकर महाराज भानावर आले. चौथ्या दिवशी महाराज प्रभादेवी ला आल्यानंतरच्या मंगळवारी त्यांनी मंदाराचे रोपटे श्रीसिद्धिविनायकाच्या मंदिरात लावले. त्या ठिकाणी हात जोडून प्रार्थना केली की,”श्री स्वामी समर्थ मी माझे काम केले, तू तुम्ही माझी इच्छा पूर्ण करा”असे बोलून श्री जांभेकर महाराज श्री सिद्धिविनायका समोर उभे राहिले आणि म्हणाले “हे गणराया श्री स्वामी समर्थ यांनी दिलेला शब्द खरा ठरो. तुला या जगात वैभव प्राप्त होवो. त्या वैभवाच्या झगमगाटाने हजारो भक्त तुझ्याकडे आकर्षित होऊन त्या सर्व भक्तांच्या ईच्छित मनोकामना पूर्ण होवो.”आजचा हा वैभव संपन्न आणि इच्छापूर्ती श्री सिद्धिविनायक या घटनेची सर्व भक्तांना क्षणोक्षणी प्रचीती देतो.

न्यासाच्या दैनंदिन कामकाजाचे व्यवस्थापन
श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास हा शासन नियंत्रित असून न्यासाचे कामकाज “श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर विश्वस्त व्यवस्था ( प्रभादेवी )अधिनियम 1980 द्वारे सुरु आहे न्यायास आयकर अधिनियम 1961 मधील कलम 10 (२३सी) (व्ही) अंतर्गत करसवलत आहे . हे न्यासाचे विश्वस्त निधीचा उपयोग प्रामुख्याने पुढील प्रयोजनासाठी करण्यात येतो.
१). भक्तांना सोयी-सुविधा पुरवणे.
२) मंदिराच्या मालमत्तेची देखभाल आणि विश्वस्त प्रशासन व्यवस्थापन
३) दैनंदिन पूजाअर्चा समारंभ आणि उत्सव आयोजित करून संपन्न करणे.
४) गरीब आणि गरजू रुग्णांना वैद्यकीय सहाय्य तसेच माफक दरात डायलेसिस प्रक्रिया आयोजन.
५) रुग्णालय प्रेक्षणिक अर्थसहाय्य करणे

विविध लोकाभिमुख उपक्रम आणि नैसर्गिक आपत्ती मधील न्यासाकडून करण्यात आलेले अर्थसहाय्य

• नैसर्गिक आपत्ती मधील भूकंपग्रस्त दुष्काळ ग्रस्त पूरग्रस्त आणि अतिरेकी हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबीयांना न्यासा करून वेळोवेळी अर्थसहाय्य केले जाते
• न्यासाकडून राज्यस्तरीय संस्था आणि रुग्णालय यांना वैद्यकीय सेवा सुविधांची पूर्तता करण्यात येते.
• राज्यातील आत्महत्यापर शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती आयोजन केले जाते.

न्यासाचे सामाजिक आणि लोकोपयोगी कामे
मानवता सेवेसाठी ‘अवयव दान’जनजागृती मोहीम

शरीर हे क्षणभंगुर आहे मृत्यूनंतर सारे नष्ट होते मात्र अवयव रुपीज जिवंत राहायचे असेल तर अवयवदान करा. मृत्युपश्चात एक देह अनेक जणांच्या आयुष्यात एक आशेचा किरण ठरू शकतो. अवयव दानविषयीचे ते अभियान न्यासाच्या आवारात राबविण्यात आले होते . या अभियानाअंतर्गत अनेक भाविकांनी आपली इच्छा व्यक्त करून अवयव दान करता नाव नोंदणी केली होती.

न्यासाचे शैक्षणिक उपक्रम
ग्रंथालय /अभ्यासिका
श्री गणेश ज्ञान विज्ञान आणि विद्या यांची देवता आहे आहे त्या दृष्टीने मंदिरात विविध विषयावरील ग्रंथाचे वाचनालय, तसेच विद्यार्थ्यांसाठी ज्ञानेच्छुकांसाठी अभ्यासिकेची तरतूद करावी असे व्यासपीठाने ठरवले त्यानुसार धार्मिक सामाजिक शैक्षणिक ऐतिहासिक शास्त्रीय व्यवसाय व्यवस्थापन प्रशासन कायदा संगणकशास्त्र इत्यादी विषयातील जवळजवळ ८००० ग्रंथांनी सुसज्ज असे ग्रंथालय आणि वाचनालय मंदिर वास्तूत सुरू करण्यात आले. या ग्रंथालयाचा उद्घाटन सोहळा वैशाख शुद्ध तृतीया शनिवार दि. २० एप्रिल,१९९६ रोजी विचारवंत, प्रज्ञावान लेखक डॉ.य.दि. फडके यांच्या अध्यक्षतेखाली आणि ख्यातनाम ललित लेखक कवी वक्ते प्रा. श्री .राम शेवाळकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला
ग्रंथालय आणि वाचनालय बरोबर एक अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे सुमारे ६००ते ७००विद्यार्थी त्याचा फायदा घेत असतात न्यासातर्फे डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित लायब्ररीत देखील सुरू करण्यात आली आहे. या लायब्ररी चे उद्घाटन दि.३० मे २००७ रोजी अर्थमंत्री मा. ना श्री. जयंतराव पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यामध्ये मेडिकल, इंजीनियरिंग च्या विविध शाखा, भारतातील सर्व कायद्यांची पुस्तके, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचे निवाडे इत्यादी क्षेत्रातील अध्यावत संशोधनावरील आधारित क्रमिक पुस्तके तसेच नियतकालिके इंटरनेटद्वारे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
मंदिराच्या नवीन प्रतीक्षालय इमारतीमध्ये चौथ्या मजल्यावर ‘रोल्टा फाउंडेशनच्या’ साह्याने अद्यावत डिजिटल ग्रंथालय सुरू करण्यात आले आहे सदर ग्रंथालयात ३० संगणक बसविण्यात आले आहेत. तसेच मंदिरासमोरील रहेजा इमारतीच्या आवारातील महानगरपालिकेचे ग्रंथालय न्यासाने भाडेतत्त्वावर घेतली असून तेथे सुसज्ज ग्रंथालय वाचनालय, यूपीएससी आणि एमपीएससी मुलांसाठी मार्गदर्शक शिबीर सुरू करण्यात येत आहेत.

न्यासाकडून राबविण्यात येणारे विविध सामाजिक, वैद्यकीय आणि लोकोपयोगी उपक्रम पुढीलप्रमाणे आहेत‌

१) रुग्णांना अर्थसहाय्य- न्यासा कडून संपूर्ण महाराष्ट्रातील गरीब आणि गरजू रुग्णांना किडनी ,कॅन्सर, मेंदू विकार मेंदूची शस्त्रक्रिया, हृदयशस्त्रक्रिया ,मुत्रपिंड, प्रत्यारोपण, लिव्हरचे प्रत्यारोपण डायलेसिस हेपेटायटीस सी, खुब्याची शस्त्रक्रिया ,गुडघ्याची शस्त्रक्रिया, मज्जातंतूंची शस्त्रक्रिया थायलेसिमिया अपघात या आजारावरील उपचारासाठी रुग्ण कमाल रु. २५०००/- पर्यंतची आर्थिक मदत केली जाते. जन्मजात कर्णबधिर मुलांना कॉकलर इम्प्लॅटसाठीही न्यासा कडून रुपये १ लक्ष ऐवढी आर्थिक मदत करण्यात येते न्यासातर्फे वैद्यकीय रुग्णांना अर्थसहाय्य करण्यासाठी प्रतिवर्षी अंदाजे रुपये १४ ते १६ कोटी इतक्या रकमेचीतरतूद करण्यात येते. अशाप्रकारे न्यासा कडे या योजनेअंतर्गत अर्थसहाय्य मिळणेबाबत अर्ज करणाऱ्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
२) डायलिसिस सेंटर- दि.१४ फेब्रुवारी २०१४ पासून सुरू न्यासाच्या मंदिरा शेजारील भव्य पाच मजली इमारती मध्ये प्रतीक्षालय शैक्षणिक आणि आरोग्य सुविधा केंद्र उभारले असून, दिवसेंदिवस डायलिसिसच्या रुग्णांमध्ये होणारी वाढ आणि गरीब रुग्णांना ही सुविधा माफक दरात उपलब्ध होण्याच्या दृष्टीने न्यासाने २१ खाटांचे सिद्धिविनायक डायलेसिस सेंटर दोन शिफ्ट मध्ये सुरू केले आहे. प्रत्येक शिफ्टमध्ये २० प्रमाणे दररोज ४० रुग्णांना डायलिसीस उपचार देण्यात येतात. तसेच गरीब गरजू रुग्णांकरिता न्यासातर्फे प्रभादेवी येथील अण्णासाहेब मराठे मार्गावरील सी. सीक्वेन्स इमारतीत नवीन डायलिसिस सेंटर सुरू करण्यात आले आहे
३). पुस्तक पेढी योजना- आर्थिक दृष्ट्या गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी न्यासाकडून अनेक वर्षापासून पतपेढी योजना राबवली जात आहे. योजने अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातील कला, वाणिज्य ,विज्ञान शाखेतील ११ वी ते १५ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना क्रमिक पुस्तके मोफत उपलब्ध करून देण्यात येतात या योजनेला महाराष्ट्रात उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

सोन्याच्या दागिन्यांचा लिलाव.
श्री सिद्धिविनायकाला भाविकांनी अर्पण केलेले सोन्याचे मौल्यवान अलंकार जसे लॉकेट,चैन,हार ,छत्र, मोदक,गणेश मुर्ती,बिस्किट ,कॉइन इ. चा . समावेश असतो अशा अलंकाराचा जाहीर लिलाव करून विक्री करण्यात येते. लिलाव हे सार्वजनिक सुट्टी, रविवार ,संकष्टी ,गुढीपाडवा ,अक्षय तृतीया ,इ. दिवशी आयोजित करण्यात येतात , जेणेकरून जास्तीत जास्त भाविकांना यात सहभागी होऊन “श्री” चे अलंकार प्राप्त करण्यात लाभ घेता येईल.
सदर सर्व दागिने हे “श्री” चरणी अर्पण करण्यात आलेले असल्याने त्यास एक अनन्य साधारण महत्त्व असते लिलावाद्वारे न्यासास प्राप्त होणारा निधी न्यासाकडून राबविण्यात येणाऱ्या सामाजिक आणि लोकोपयोगी उपक्रमाकरिता वापरला जातो.
भाविकांसाठी संगणकीकृत सेवेची उपलब्धता
न्यासाचे स्वतंत्र वेबसाईट असून त्यावर मंदिराचा इतिहास दैनंदिन होणाऱ्या पूजाअर्चा आणि त्यांचे वेळापत्रक “श्री” ची फोटो गॅलरी न्यासाची वर्षभरात होणारे विविध उपक्रम मंदिरात साजरे होणाऱ्या विविध सणांची माहिती इ .माहिती उपलब्ध केलेली आहे. त्याचप्रमाणे न्यासाकडून करण्यात येणाऱ्या विविध पूजांची ऑनलाइन नोंदणीची सुविधा देखील देण्यात आलेले आहे कोविड-19 च्या पार्श्वभूमीच्या अनुषंगाने भाविकांना “श्री ” च्या दर्शनासाठी न्यासाकडून क्यूआर कोड पद्धती अवलंबविण्यात आली आहे. श्री सिद्धीविनायक मंदिरात भक्तासाठी भाविकांच्या उपस्थितीत तसेच अनुपस्थित विविध प्रकारच्या पूजा करण्यात येतात पूजा तपशीलाबाबत न्यासाच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे.
कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर भाविकांना थेट दर्शनासाठी ऑनलाइन पद्धतीत सिद्धीविनायक संकेत स्थळ( Siddhivinaya temple App) येथे व्यवस्था केलेली आहे.

संकेत स्थळ : – www.siddhivinayak.org

ई-मेल :- admin@siddhivinayak.org

दूरध्वनी :- ०२२-२४२२४४३८

फॅक्स :- ०२२-२४२२१५५८
दर्शन व्यवस्था संकेतस्थळ:- Siddhivinaya temple App

  नकाशा स्थान     श्री सिद्धिविनायक मंदिर

छायाचित्र दालन

  • श्री सिद्धिविनायक मंदिर, प्रभादेवी, मुंबई
    श्री सिद्धिविनायक मंदिर
  • Sidhivinayak temple.
    सिद्धिविनायक मंदिर

कसे पोहोचाल?:

विमानाने

छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ 12 किमी अंतरावर आहे. ती विमानतळ विले पारले पूर्वमध्ये आहे. डोमेस्टिक टर्मिनल सांताक्रूझ 11.4 किमी अंतरावर आहे.

रेल्वेने

दादर रेल्वे स्थानक पासून 2.5 किमी अंतरावर आहे.

रस्त्याने

दादर वेस्टकडून टॅक्सी किंवा बेस्ट बस मिळू शकतात.